कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको; मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने.

सीएए आणि एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणारी वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीची वेळ असल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी उसळली आहे.

मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकात आज सकाळ सुमाराला बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळांवर उतरत एसएमटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील लोकल रोखून धरली. ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा हा रेल रोको अर्धातास सुरु होता.